
सरंद येथे यंत्राद्वारे भातलागवडीचे प्रात्यक्षिक
संगमेश्वर : तालुक्यातील सरंद येथे यंत्राद्वारे भातलागवड कशी करतात याचे प्रात्यक्षिक झाले. यावेळी सरंद व आंबव पोंक्षे गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे प्रात्यक्षिक संगमेश्वर तालुका कृषी विभागातर्फे घेण्यात आले. या प्रात्यक्षिकांतर्गत यंत्राद्वारे भातलागवड कशी केली जाते, याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. याविषयीचे व्हीडिओ प्रोजेक्टरद्वारे दाखवण्यात आले. गादी वाफ्यावर भात रोप कसे तयार करतात याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या गादी वाफ्यावर भात रोप तयार झाल्यावर 18 दिवसांनी प्रत्यक्ष यंत्राद्वारे भातलावणी कशी करायची याची माहिती देण्यात आली. यंत्राद्वारे भातलावणी प्रक्रिया किती सोपी आहे याविषयी तालुका कृषी अधिकारी ए.एम.झानजे यांनी माहिती दिली. यावेळी कृषी विभागाकडून राजेंद्र माने, टी. एन. शिवगण, बी. पी. दौंड यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सरंद येथील संतोष गोटेकर, सोमा गोटेकर, शांताराम गोटेकर, अर्जुन गोटेकर, आदी तर आंबवपोंक्षे येथून उपसरपंच शेखर उकार्डे, मंगेश मांडवकर ,सोमा मांडवकर, संतोष मांडवकर, सीताराम धुळप आदी उपस्थित होते.