रिफायनरीला विरोध करणारे मुख्यमंत्री ठाकरे आणि शिवसेना अचानक सकारात्मक कशी झाली? अशोक वालम यांचा पत्रकार परिषदेत सवाल
रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणातील जनतेचा विश्वासघात केला आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून रिफायनरीसाठी नाणारऐवजी बारसूची जागा सूचवली. राज्यातील दोन कॅबिनेट मंत्र्यांसह राजापूरचे आमदार राजन साळवी यांनीही पाठिंबा असल्याचे पत्र जिल्हाधिकार्यांना दिले आहे. एमआयडीसीसाठी बारसुतील ग्रामस्थांकडून जमिनी घेतल्या आणि फसवणूक करत ही जागा रिफायनरीला देण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे स्थानिक जनता आता शांत बसणार नाही. आगामी निवडणुकीत शिवसेनेला याची किंमत मोजावी लागेल, असे परखड मत रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी केला. रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी वालम म्हणाले, ‘रिफायनरी म्हणजे विष’ असे सांगणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भूमिकेत अचानक बदल कसा काय झाला? केंद्र सरकारने नाणार येथे रिफायनरी प्रस्तावित केल्यानंतर त्याला स्थानिकांनी तीव्र विरोध केला. विरोध करणार्या स्थानिकांची एकजूट पाहिल्यानंतर शिवसेनेने आंदोलनात उडी घेतली. विरोधाच्या मागणीला आमचा पाठिंबा असल्याचे सांगत शिवसेनेचे आमदार राजन साळवी आंदोलनात सहभागी होत होते. रिफायनरी हा मुद्दा शिवसेनेसाठी संपला असे सांगितले जात होते, मात्र आता पाठिंबा कसा काय? असा प्रश्न अशोक वालम यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.