
बारसू येथे रिफायनरीसाठी केंद्र सरकारची तयारी : माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांचे प्रतिपादन
रत्नागिरी : बारसू, सोलगाव येथे रिफायनरीसाठी केंद्र सरकारने तयारी सुरु केली आहे. या प्रकल्पामुळे रोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत. काही चिरीमिरी करणारे लोक सोडल्यास या प्रकल्पाला विरोध नाही. सगळीकडे सकारात्मक वातावरण आहे, त्यामुळे बारसू येथे रिफायनरी होणार असे मत माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी राणे म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली 13 जून रोजी दिल्लीत पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट झाली. 70 ते 80 हजार कोटींचा प्रकल्प करण्यास ना. पुरी यांनी तयारी दर्शवली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारनेही समर्थनार्थ पत्र दिलेले आहे. राजापूरचे आमदार राजन साळवी यांनीही प्रकल्प व्हावा, यासाठी पावले उचलली आहेत. सौदी अरेबियातील अरामको या कंपनीशी चर्चा करुन पुढील तयारी केली जाणार आहे. यामध्ये 70 ते 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून हा पहिला टप्पा आहे.
भविष्यात त्याचा विस्तार करण्यात येईल, असे राणे म्हणाले. सध्या सर्वेक्षणाला विरोध होत आहे. पण कार्यवाही सुरूच आहे. विरोध न करता जनतेने पाठिंबा द्यावा, असेही राणे म्हणाले.