
चिपळूण शहरातील स्वच्छतागृहात एकमेकांलगत उभारले दोन कमोड
चिपळूण : शहरातील एका स्वच्छतागृहाचे बांधकाम करताना एकाच स्वच्छतागृहात दोन कमोड बाजूबाजूला बसवल्याने ही स्थापत्यकला चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे लोकांनी एकाचवेळी कमोड, आंघोळ आणि हात धुण्यासाठी याचा वापर करायचा की काय? असा सवाल आता नागरिक व्यक्त करीत आहेत. चिपळूण नगर परिषदेतील नगर अभियंते, आर्किटेक्ट यांच्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या दोन कमोडसमोरच तीन ते चार बेसिनदेखील आहेत. शिवाय आंघोळ करण्याची सुविधादेखील उपलब्ध केली आहे. त्यामुळे या बाथरुमची चर्चा शहरात सर्वत्र सुरू आहे. शहरातील कानसेवाडी येथील समाज भवनामध्ये 58(2) अंतर्गत चिपळूण नगर परिषदेने स्वच्छतागृह बांधले आहे.