
कोरोनाकाळात बंद असलेल्या शाळा गजबजल्या; पाठ्यपुस्तकांचे वितरण, पोषण आहाराचे नियोजन लांबले
रत्नागिरी : जिल्ह्यातील प्राथमिकच्या 2 हजार, माध्यमिक 350 शाळांचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले. ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव झाले. ढोलताशांच्या गजरात वाजत-गाजत नवागतांचे स्वागत करण्यात आले. सुमारे दोन वर्षे बंद असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच ठिकाणी नवागतांचे ढोल-ताशाच्या गजरात वाजत-गाजत स्वागत करण्यात आले.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने शाळा प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला असून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षणविभागाकडून सर्वच शाळांना देण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळांमध्ये 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांना हे वितरित करण्यात आले. यासाठी 6 लाख 13 हजार पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. तर यावर्षी पहिलीच्या वर्गात 12 हजार 206 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. शालेय पोषण आहाराचे मात्र तीन-तेरा वाजले आहेत. अजूनही शाळांना पोषण आहाराचे साहित्य मिळाले नसल्याने पहिल्या दिवशी मुले जेवणापासून वंचित राहिली. शिक्षण विभागाने शिरा करून विद्यार्थ्यांची भूक भागवली आहे. अजूनही चार-पाच दिवस पोषण आहाराचे साहित्य येणार नसल्याने आहारापासून विद्यार्थ्यांना वंचितच राहावे लागणार आहे.