बहुचर्चित भरणे उड्डाण पूल अखेर वाहतुकीस खुला भरणे नाका परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली
——————————–
खेड :मुंबई गोवा महामार्गावरील बहुचर्चित भरणे नाका यहेथील उड्डाण पूल अखेर वाहतुकीस खुला झाला आहे. उड्डाण पुलावरील एका मार्गिकेचे काँक्रीटीकरण पूर्ण झाल्यावर या मार्गिकेवरून वाहतूक सुरु करण्यात आली असल्याने वाहन चालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गेले तीन वर्ष या पुलाचे काम सुरु होते त्यामुळे भरणे परिसरात वाहतुकीचा खेळखंडोळंबा झाला होता. पावसाळ्यात तर या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत होती. आजपासून हा पूल वाहतुकीस खुला झाल्याने येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघाला आहे.
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणादरम्यान महामार्गावरील जंक्शन असलेल्या भरणे नाका येथे आधी भुयारी मार्ग प्रस्तावित होता. या ठिकाणी भुयारी मार्गासाठी खोल खड्डाही खणण्यात आला होता मात्र अचानक येथील भुयारी मार्ग रद्द करून उड्डाण पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. भरणे नाका जंक्शनवर असणारी वाहतूक, तसेच या ठिकाणी ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेत उड्डाण पुलाचे काम वर्षभरात पूर्ण करणे गरजेचे होते मात्र कल्याण टोलवेज या ठेकेदार कंपनीकडून गेली तीन वर्षे उड्डाण पुलाचे काम सुरु होते त्यामुळे भरणे नाका येथील जंक्शनवर नेहमीच वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र पहावयास मिळत होते. पुलाचे काम सुरु झाल्यावर आंबवली विभागातील सुमारे १५ गावांकडे जाणारा रस्ताही बंद झाल्याने या भागात जाणाऱ्या प्रवाशांना हेल्पाटा मारावा लागत होता.
रखडलेले पुलाचे काम पूर्ण व्हावे यासाठी माध्यमातून नेहमीच ओरड सुरु होती मात्र कल्याण टोलवेज कंपनी आणि महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने महामार्गावरून प्रवास करणारे प्रवाशी, वाहन चालक तसेच भरणे नाका येथील व्यावसायिक आणि ग्राहक यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. पुलाचे काम सुरु झाल्यावर कंपनीने केलेल्या पर्यायी रस्त्यांवरही कायम खड्ड्यांचे साम्राज्य राहिल्याने या ठिकाणी अपघात देखील होत होते.
उड्डाण पुलाचे रखडलेले काम पूर्ण करून उड्डाण पूल वाहतुकीस खुला करण्यात यावा अशी मागणी वारंवार केली जात होती मात्र याकडे लक्ष द्यायला संबंधित यंत्रणांना वेळ नव्हता. अखेर भरणे उड्डाण पुलाचे घोडे गंगेत न्हाले आणि आजपासून या पुलाची एक मार्गीका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. पुलावरून वाहतूक सुरु झाल्याने वाहन चालक आणि प्रवासी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
पुलावरून वाहतूक सुरु झाली असली तरी पुलाखालून आंबवलीकडे जाणारा मार्ग अद्याप सुरु करण्यात आलेला नाही. त्यामुळे या परिसरात जाणाऱ्या प्रवाशांना आजही हेलपाटा मारून जावे लागत आहे. येत्या दोन तीन दिवसात आंबवलीकडे जाणारा मार्गे ही खुला होईल असे महामार्ग बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
www.konkantoday.com