शाळेची वाट जमीन मालकाने केली बंद…भर पावसात विद्यार्थी रस्त्यावरच, रायपाटण गावातील प्रकार
राजापूर : शाळेच्या जमिनीवर लगतच्या जमीन मालकाने दावा करून शाळेकडे जाणारी वाट कुंपण घालून बंद केल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना भर पावसात शाळेबाहेर उभे राहण्याची वेळ आली. रायपाटणमधील केंद्रशाळा नंबर एकमध्ये हा प्रकार घडला. रायपाटण केंद्रशाळा क्रमांक एकच्या जागेबाबत गेली काही वर्षे वाद सुरु आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ बनले आहे. शाळेचा सात बारा जि.प.च्या नावावर असल्याचे समजते. न्यायप्रविष्ठ असलेल्या या प्रकरणी अखेर कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे रायपाटणच्या जिजामाता विद्यामंदिरात शाळा भरविण्यात आली. रायपाटणची ही केंद्रशाळा फार जुनी आहे. शाळेच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने शाळेचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही.