
‘रिफायनरी’बाबत स्थानिकांचा संभ्रम दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक; तीन हजार एकर जागेची संमतीपत्रके ग्रामस्थांकडून सुपूर्द
राजापूर : तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित असणार्या ग्रीन रिफायनरीच्या ड्रोन सर्वेक्षणाला काही ठिकाणी विरोध झाला तर काही ग्रामस्थ व ग्रामपंचायतींनी पाठिंबा दर्शवला आहे. ग्रामस्थांमध्ये संभ्रमावस्था असल्याने सर्वेक्षणाला जाणार्या अधिकार्यांना रोखण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांमधील संभ्रम दूर व्हावा यासाठी विशेष बैठक रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी अकरा गावातील सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी सहमती दर्शवली असून तब्बल तीन हजार एकर जागेची संमतीपत्रक ग्रामस्थांनी अधिकार्यांकडे सुपूर्द केली. या बैठकीला एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मलिकनेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवी कटकधोंड, आमदार राजन साळवी, उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, माजी जि.प. सदस्य दीपक नागले, माजी प.सं. सदस्य सुभाष गुरव, नाटेतील पं.स. सदस्य उन्नती वाघरे, धोपेश्वर सरपंच दत्ताराम करंबेळकर, उपसरपंच स्नेहा उगले, नाटे सरपंच योगिता बनकर, उपसरपंच पुरुषोत्तम थलेश्री यांच्यासह एकूण अकरा ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच व सदस्य, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे माजी सदस्य उपस्थित होते.
बैठकीवेळी रिफायनरीअंतर्गत येणार्या ग्रामपंचायतीतील पाठिंबा देणार्या सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी विविध मागण्या सादर केल्या. त्याचप्रमाणे रिफायनरीमध्ये प्राधान्याने ग्रामस्थांना रोजगार देण्यात यावा याची मागणी करण्यात आली.