कोकणात येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा
रत्नागिरी : मोसमी पावसाच्या प्रवासात आणखी प्रगती होणार आहे. येत्या 48 तासांत कोकणात मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे. मोसमी पाऊस कोकणाच्या उंबरठ्यावर असून, पुढील दोन दिवस कोकणात वादळी वार्यासह मुसळधार पावसाची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तविली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने मान्सून अलर्ट जारी केला आहे. उर्वरित विभागाात येणार्या पाच दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पोषक वातावरण असल्यामुळे दोन दिवसांपासून जलद गतीने प्रवास करत असलेला मान्सून अखेर मुंबई ठाणे आणि कोकणातील बर्याच भागांमध्ये येऊन धडकला. मान्सूनच्या प्रवासाचा विचार केला तर अरबी समुद्राच्या बाजूने मोसमी पावसाच्या प्रवासाला 9 जूनपासून चांगली चालना मिळाली. पोषक वातावरण तयार झाल्याने 10 जूनला त्याने गोवा पार करून दक्षिण कोकणातून पूर्वमोसमी पावसाने हलकी चाहूल दिली. सध्या मोसमी पावसाच्या प्रवासाला अनुकूल वातावरण असल्यामुळे येणार्या 48 तासांमध्ये तो कोकणातील सर्व भाग व्यापून थेट गुजरातपर्यंत मजल मारील, असा ‘आयएमडी’चा अंदाज आहे.