जिल्ह्यातील शाळा 15 जूनपासून भरणार, पहिलीच्या वर्गात 12 हजार 206 विद्यार्थी होणार दाखल
रत्नागिरी : नवीन शैक्षणिक वर्ष सोमवार दि.13 जूनपासून सुरू होत असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावरही पुढील शैक्षणिक वर्ष दि. 13 जूनपासून सुरू होईल, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काही उपाययोजनांमुळे या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दि. 15 जूनपासून विद्यार्थ्यांचे वर्ग भरतील, असे जाहीर केले आहे. तशा सूचनाही शिक्षण विभागाला दिल्या आहेत. यावर्षी पहिलीच्या वर्गात 12 हजार 206 विद्यार्थी शिक्षणाचा श्रीगणेशा करणार आहेत. तारखांच्या या गोंधळामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र, आता त्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. पहिले दोन दिवस फक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीच उपस्थित राहणार आहेत. त्यांना शाळा वर्गखोल्या व परिसर स्वच्छता करणे, सुशोभिकरण, कोरोना नियमावली पालनासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करणे आदी शाळापूर्व तयारी करावी लागणार आहे.