
राजापूर तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनांना निधी
राजापूर : तालुक्यातील जांभवली, तुळसवडे, कोतापूर तर लांजा तालुक्यातील पालू, कोचरी (डफळेवाडी), लघु पाटबंधारे योजनांना निधी उपलब्ध झाला आहे. प्रशासकीय मान्यता मिळून निविदास्तरावर कार्यान्वित आहे.
राजापूर विधानसभा मतदार संघामध्ये भेडसावणारी पाणीटंचाई आणि रखडलेले प्रकल्प याबाबत आमदार डॉ. राजन साळवी यांनी अनेकवेळा तारांकित प्रश्न उपस्थित केले होते. रखडलेल्या प्रकल्पांना निधी मंजूर होण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न केले होते, त्या प्रयत्नांना यश आले आहे.
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाव्दारे ही कामे चालू आहेत. परंतु महामंडळाला मुदतवाढ नसल्याने तसेच निधी उपलब्ध नसल्याने ही सर्व कामे ठप्प होती. या प्रकल्पाबाबत ठेकेदारांची देयके तसेच आवश्यक निधीसाठी शासन तरतूद करून प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार योजनांचे अंदाजपत्रक तयार करण्यात येऊन निधी उपलब्ध करून शासनस्तरावर मान्यता देण्यात आली. आमदार डॉ. राजन साळवी यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे लघु पाटबंधारे योजनांना 213 कोटी 68 लाख रुपये निधी प्राप्त झाला असून सदर प्रकल्पांमुळे संघातील पाणी टंचाईला दिलासा मिळणार आहे.