चिपळूण तालुक्यातील फेरफार अदालतीत ६२ प्रकरणे निकाली
चिपळूण : राज्य सरकारच्या महाराजस्व अभियान अंतर्गत दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी तालुक्यातील मंडल स्तरावर नायब तहसीलदार व मंडल अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली फेरफार अदालत आयोजित करण्यात येते. त्यानुसार बुधवारी येथे झालेल्या फेरफार अदालतीत ६२ प्रकरणे निकालात काढण्यात आली. यामध्ये साध्या नोंदी २४, वारस नोंदी ३६ व २ तक्रारींचा समावेश होता. हा उपक्रम शेतकरी वर्गासाठी उपयुक्त ठरल्याने त्यांनी महसूल विभागाचे विशेष आभार मानले.
बुधवार दि. ८ जून रोजी चिपळूण, खेर्डी, कळकवणे, शिरगाव, रामपूर, मार्गताम्हाणे, सावर्डे, असुर्डे, निवळी अशा नऊ ठिकाणी फेरफार अदालत घेण्यात आली. तलाठी, मंडल अधिकारी स्तरावर जे फेरफार विनातक्रारी आहेत आणि ज्या फेरफारची नोटीस बजावणी होऊन १५ दिवस पूर्ण झालेले आहेत. या अदालतीत चिपळूण शहरातील साध्या नोंदी ३, वारस नोंद ५ करण्यात आल्या. तसेच शिरळ येथील ५, असुर्डे १२, कळकवणे ५, खेर्डी ८, निवळी ७, वहाळ २, मार्गताम्हाणे ३, रामपूर ४, शिरगाव ५ व सावर्डे ३ प्रकरणांच्या फेरफार नोंदी करण्यात आल्या.