रत्नागिरीत भाजपाच्या दुचाकी फेरीला प्रतिसाद
मोदी सरकारची ८ वर्षे
घोषणांनी आसमंत दुमदुमला
राज्यसभेतील विजयाबद्दल जल्लोष
फटाक्यांची आतषबाजी
पेढे वाटून आनंदोत्सव
रत्नागिरी
देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, भारतीय जनता पक्षाचा विजय असो, देवेंद्र फडणवीस आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारत माता की जय अशा घोषणा देत भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आज शहरामध्ये दुचाकी फेरी काढण्यात आली. पंतप्रधान मोदी यांच्या केंद्र सरकारला ८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोठ्या जल्लोषात आणि घोषणा देत शहर परिसरात फेरीला उदंड प्रतिसाद मिळाला. भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली ही फेरी काढली.
८ वर्षांत मोदी सरकारची उत्तुंग कामगिरी आणि विविध विकास योजना, तसेच आज राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचा तिन्ही जागांवर विजय याचे औचित्य साधून हा जल्लोष करण्यात आला. सायंकाळी मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. येथे फटाक्यांची माळ लावून जल्लोष करण्यात आला. त्यानंतर दुचाकी फेरीला सुरवात झाली. मारुती मंदिर, माळनाका, एसटी स्टॅंडमार्गे, राम आळी, गोखले नाका, गाडीतळ, शेरे नाका मार्गे टिळक आळीतून भाजपाच्या जिल्हा कार्यालयापर्यंत फेरी काढली. रिमझिम पावसातही फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला. विशेषतः एसटी स्टॅंड, राम आळी, गोखले नाका परिसरामध्ये शहर वासियांचा चांगला प्रतिसाद मिळाला. काही लोकांना भाजपाचा विजय असो अशाही घोषणा देत कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले.
फेरीच्या सांगतेवेळी भाजपा कार्यालयाबाहेर जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी पत्रकारांना सांगितले की, आज राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. भाजपाला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भरघोस यश मिळाले. भाजपाचे तिनही उमेदवार राज्यसभेवर निवडून गेले. प्रस्थापित महाआघाडीला चारी मुंड्या चीत करून भाजपाने यश मिळवले आहे. देवेंद्र फडणवीस यांची रणनिती व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे कष्ट व भाजपाच्या सर्व आमदारांची एकसंध टीम यामुळे हा विजय साध्य झाला. भाजपाच्या या यशाबद्दल आनंद, जल्लोष करावा तसेच देशाचे पंतप्रधान केंद्र सरकारला ३० मे रोजी ८ वर्षे पर्ण झाली. ही वर्षे सुशासनाची होती. जनसामान्यांना न्याय देणारी होती. भारतमातेला जगात अग्रस्थानी नेण्यासाठी भरीव काम केले. याचा आनंद व्यक्त करावा, जनसामान्यांमधील प्रतिक्रिया व्यक्त व्हाव्यात, याकरिता फेरी काढली.
या वेळी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम जैन, तालुकाध्यक्ष अॅड. ऋषिकेश कोळवणकर, वैभव पटवर्धन, भाजप शहराध्यक्ष सचिन करमरकर, बाबू सुर्वे, राजेंद्र पटवर्धन, उमेश कुळकर्णी, ओंकार फडके, ऐश्वर्या जठार, पल्लवी पाटील, मानसी करमरकर, संपदा तळेकर, प्राजक्ता रुमडे, समीर तिवरेकर, राजू तोडणकर, अॅड. बाबा परुळेकर, अॅड. अशोक कदम, सी.ए. श्रीरंग वैद्य, डॉ. संतोष बेडेकर, विजय सालीम, दामोदर लोकरे, मंदार खंडकर, नितीन जाधव, यांच्यासमवेत भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर, तालुका पदाधिकारी, महिला आघाडी, ओबीसी आघाडी, शहर, तालुका व जिल्ह्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.