
धक्कादायक! तवसाळ परिसरात तोडले जाताहेत गुरांचे पाय
गुहागर : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडीतील दीपक वाघे यांच्या पाळीव बैलावर अज्ञात व्यक्तीने भ्याड हल्ला केला आहे. बैलाचे पुढील दोन्ही पाय तोडल्याची घटना घडली आहे. ऐन शेती हंगामात शेतकर्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. एका महिन्यात ही दुसरी घटना घडली आहे.
तवसाळ तांबडवाडीतील गुरे आजूबाजूच्या वाडीत व गावात गेली असता काही नागरिक त्यांना मारहाण करून जखमी करत आहेत. विशेषतः त्यांच्या पायावर जोरदारपणे मारहाण करून त्यांना चालता येणार नाही अशी अवस्था करून ठेवत असल्याची माहिती शेतकरी दीपक वाघे यांनी दिली. तवसाळ येथील शेतकरी वाघे यांचा बैल 12 दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा सर्वजण शोध घेत होते. रोहिले गावातील जंगलात बैल बसलेला पाहिला. मात्र, त्याचे दोन्ही पुढचे पाय तोडलेले होते.
दरम्यान, शेतकरी दीपक वाघे यांनी अशी शंका व्यक्त केली की, कोणाच्या बागेत किंवा कोणाच्या दारुच्या भट्टीत बैल गेला असावा. त्याला बांधून त्याचे दोन्ही पाय तोडले असावे किंवा जंगलात डुक्करांसाठी लावलेल्या फासकीत अडकून त्याचे पाय तुटले असावेत. ऐन शेतीच्या हंगामात मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.