
पावसाळी वातावरण रासायनिक कारखानदारांच्या पथ्यावर आकाशात ढग दाटून येताच कारखानदारांनी वातावरणात सोडला घातक प्रदूषित वायू
खेड : गेले दोन दिवस तयार झालेल्या पावसाळी वातावरणाचा फायदा उचलत लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांनी वातावरणात विषारी वायू सोडायला सुरवात केली आहे. मोठ्या प्रमाणात घातक प्रदूषित वायू हवेत सोडला जात असल्याने या परिसरात अनेकांना श्वास गुदमरू लागला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या अधिकाऱ्यांसमोरच वातावरणात विषारी वायू सोडण्याच्या घटना घडत असल्याने कारखानदारांवर वाचक कुणाचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोटे औद्योगीक वसाहत आणि प्रदूषण हे गेल्या अनेक वर्षाचे समीकरण आहे. येथील रासायनिक कारखानाच्या प्रदूषणामुळे हा संपूर्ण परिसराची माती झाली आहे. परिसरातील जलस्रोत दूषित झाले असल्याने ऐन पावसाळ्यात परिसरातील काही गावांना पाणी टंचाईचा सामाना करावा लागतो आहे. शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून देणारी आंबा काजू ही पिके इतिहासजमा झाली आहेत. प्रदूषणाच्या नावाने परिसरातील नागरिक टाहो फोडत आहेत मात्र कमी खर्चात जास्तीजास्त रासायनिक उत्त्पन्न घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या कारखानदारांना त्याचे काहीही सोयरसुतक राहिलेले नाही.
गेले दोन दिवस तयार झालेल्या पावसाळी वातावरणाचा फायदा उठवत कारखानदारांनी वातावरणात घातक प्रदूषित वायु सोडण्यास सुरवात केली आहे. आकाशात ढग दाटून येताच कारखानदारांना संधी उपलब्ध झाली आहे. रासायनिक कारखान्यांचे धुराडे मोठ्या प्रमाणात धूर ओकू लागले आहेत. वातावरणात अचानक सोडल्या जाणाऱ्या घातक प्रदूषित वायूमुळे लोटे औद्योगीक परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. खोकला येणे, मळमळणे असे प्रकार सुरु झाले आहेत. संबंधित कारखानदारांवर वेळीच कारवाई केली गेली नाही तर संपूर्ण पावसाळ्यात येथील नागरिकांना वारंवार हा त्रास सहन करावा लागणार आहे. रासायनिक कारखान्यात तयार होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित कारखान्यांवर वेळेचं कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
पावसाळ्यात कंपनीत कच्चे रसायन घेऊन येणाऱ्या किंवा जाणाऱ्या टँकरमधून होणारी गळती देखील येथील नागरिक आणि पाळीव जनावरांसाठी जीवावर बेतणारी आहे. या आधी रसायन मिश्रित पाणी प्यायल्याने पाळीव जनावरे दगावण्याचा घटना घडल्या आहेत या पार्श्वभूमीवर औद्योगिक वसाहतीत रसायन घेऊन येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या टँकरमधून वायू गळती होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे मात्र तशी कोणतीही खबदारी घेतली जात नालल्याने औद्योगिक वसाहतीत पाळीव जनावरांना असलेला धोका पावसाळ्यादरम्यान वाढणार आहे.
बुधवारी सायंकाळी ढग दाटून आले आणि काही काळ पावसाचा शिडकावा झाला याच दरम्यान लोटे औद्योगिक वसाहतीत रसायन घेऊन आलेल्या टँकरमधून रसायन गळती झाली. पावसामुळे रस्त्यावर जमा झालेल्या पाण्यामध्ये मिसळलेले हे रसायन पाळीव जनावरे चाटू लागली. काही नागरिकांनी हे पाहिल्यानंतर त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी रस्त्यावर पडलेल्या रसायनाची पाहणी करत असतानाच एका कारखान्यातून मोठ्या प्रमाणात घातक वायू हवेत सोडण्यात आला. नागरिकांनी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष वेधले मात्र त्यातून फारशे काही निष्पन्न झाले नाही. पावसाळी वातावरणाचा फायदा घेत अशा प्रकारे वायू प्रदुषण केले जात असले तर [प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.