आपत्कालीन परिस्थितीत जनतेला तत्काळ मदत करा : अॅड. अनिल परब यांच्या सूचना
रत्नागिरी : आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यात यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही. आपत्कालीन परिस्थितीत जिल्ह्यातील जनतेला तत्काळ मदत मिळण्याच्या दृष्टीने यंत्रणा सक्षमपणे तयार ठेवा, असे निर्देश पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे गुरुवारी मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली. त्यावेळी अॅड. परब बोलत होते.
खासदार विनायक राऊत हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. दरडप्रवण गावांवर जास्त लक्ष ठेवा. शास्त्री नदीवरील पूल जुना असून, नवीन पुलाच्या एका बाजूचा अॅप्रोच रस्ता झाला असून दुसर्या बाजूचा अॅप्रोच रस्ता तत्काळ तयार करून तो पावसाळा सुरू होण्यापूर्वी सुरू करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना खासदार विनायक राऊत यांनी दिल्या.
दरडप्रवण क्षेत्रातील प्रत्येक गावात प्राथमिक अंदाजासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिस यंत्रणाही सक्षमपणे तयार आहे. सामाजिक संस्थांनाही आपत्कालीन परिस्थिती संदर्भात प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले. यावर्षी आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही आणि निर्माण झालीच तर ती सक्षमपणे हाताळू, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी दिला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर आदी उपस्थित होते.