मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे येथे पहाटे चालण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकावर पैशाची मागणी करत हल्ला
कणकवली : तालुक्यातील कासार्डे येथे मुंबई-गोवा महामार्गावरील कासार्डे तिठ्ठा ओव्हर ब्रीजवर तळेरे येथील मेडिकल व्यावसायिक जगदीश डंबे (रा. कासार्डे जांभळगाव) यांच्यावर तीन अज्ञातांकडून चाकूचा धाक दाखवून पैशाची मागणी करत प्राणघातक हल्ला केला.
पहाटे पाचच्या सुमारास चालण्यासाठी गेले असताना कासार्डेहून तळेरेच्या दिशेने जाणा-या लेनवर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी हा हल्ला केला. यात डंबे याच्या नाकावर ठोसा लावत जखमी केले. तर हातातील सोन्याची अंगठी व पैसै हुसकावण्यासाठी पोटात सुरा घुसवण्याचा प्रयत्न केला. मात्र डंबे यांनी प्रतिकार केला. आरडाओरडा केल्यानतंर दुचाकीवरून आलेले ते तीन इसम सुमारे बत्तीस हजारांचा मोबाईल घेऊन कणकवलीच्या दिशेने पसार झाले. या हल्ल्यात डंबे नाकावर जखम झाल्याने रक्तबंबाळ झाले होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत जखमी डंबे यांना कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करत प्राथमिक उपचार केले. कणकवली पोलिस घटनास्थळी दाखल होत माहिती घेऊन अधिक तपास करीत आहेत. पहाटे झालेल्या थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे घबराट निर्माण झाली आहे.