माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पर्यटनरत्न मुळे पर्यटनास चालना मिळेल-ॲड. अनिल परब
कॉफी टेबल बुकचे पालकमंत्र्यांनी केले प्रकाशन
रत्नागिरी दि.०९:- पर्यटन दृष्ट्या महत्व असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याची ओळख करुन देणारे कॉफी टेबल बुक पर्यटनास चालना देण्यासोबत या जिल्ह्याला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यास मदत करेल असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी केले.
येथील जिल्हा माहिती कार्यालयातर्फे काढण्यात आलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन ॲङ अनिल परब यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले. या पुस्तकात सर्व पर्यटकांना तसेच जिल्ह्यात येणाऱ्या सर्व गणमान्य अतिथींना जिल्ह्याचा परिचय होईल असे सांगून या पुस्तकाचे प्रकाशन झाल्याचे जाहीर केले. खासदार विनायक राऊत यांची यावेळी ऑनलाईन उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर आदींची उपस्थिती होती.
पर्यटनरत्न नावाने प्रकाशित या १०८ पानी कॉफी टेबल बूक साठी प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालक दिपक कपूर यांचे प्रोत्साहन लाभले. याबाबत संचालक (माहिती) गणेश रामदासी आणि उपसंचालक (माहिती) कोकण विभाग डॉ. गणेश मुळे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
या कॉफी टेबल पुस्तकाबाबत आरंभी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी माहिती दिली. पालकमंत्री ॲङ अनिल परब तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नियोजन निधीतून केलेली तरतूद व मार्गदर्शन याबद्दल आभार व्यक्त केले.
या पर्यटनरत्न कॉफीटेबल बुक मध्ये तालुकानिहाय असणाऱ्या सर्व महत्वाच्या ठिकाणांची माहिती दिली आहे. यात जिल्ह्यातील गड-किल्ले यासह पर्यटनाची इतर ठिकाणे यासोबत या जिल्ह्यातील जीवनशैली आणि खाद्यपरंपरा याबाबत विस्तृत माहिती सचित्र दिली आहे.
रत्नागिरीची ओळख सुंदर समुद्र किनारे असणारा जिल्हा अशी त्यासाठी यात सर्व महत्वाच्या समुद्रकिनाऱ्याबाबत माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यात हापूस आंबा, काजू तसेच शेतीमधील इतर उत्पादने तसेच सण, उत्सव आणि परंपरा याचीही माहिती यात समाविष्ट आहे.