
मान्सून शनिवारपर्यंत कोकणात
मान्सून गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देत आहे. 16 मे रोजी तो अंदमानात दरवर्षीच्या तुलनेत सहा दिवस आधी आला. त्यापुढे प्रगती करत केरळमध्येही 29 मे रोजी तीन दिवस आधीच दाखल झाला. मात्र त्यानंतर त्याचा प्रवास अडखळला. अरबी समुद्रात हवेचा दाब जास्त असल्याने तो कर्नाटक किनारपट्टीवर गेल्या 12 दिवसांपासून रेंगाळला होता. मंगळवारी अखेर त्याने किंचित गती घेत महाराष्ट्राच्या दिशेने कूच केले. मात्र, त्याची गती अतिशय कमी असल्याने तळकोकणात येण्यास शनिवार उजाडणार आहे.