
रत्नागिरी येथील खो-खो स्पर्धेत आर्यन लायन संघ अव्वल
रत्नागिरी : येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर प्रकाश झोतामध्ये सुरू असलेल्या आर्यन क्लब आयोजित कै. दिगंबर नाचणकर लिग खो-खो स्पर्धेत आर्यन लायन संघाने दोन्ही सामने जिंकून अव्वल स्थान राखले आहे. तर आर्यन फायटर संघाने एक सामना जिंकला आहे.
येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणवर या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे माजी सचिव तथा स्पर्धा समिती प्रमुख संदीप तावडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष राकेश चव्हाण, भालचंद्र नाचणकर, शाम नाचणकर, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय साळवी, माजी खो-खो खेळाडू शैलेश सावंतदेसाई, राजू चव्हाण, पत्रकार राजेंद्र चव्हाण, राजेश चव्हाण, विनोद मयेकर, राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे, प्रसाद पाटील, प्रशांत कवळे, लिना घाडीगावकर, श्रीमती संध्या सावंत यांच्यासह खो-खो प्रेमी उपस्थित होते. आर्यन क्लबच्या मुलींच्या संघाचा दबदबा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. अनेक आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडू मैदानावर सराव करत घडले आहेत. यासाठी कै. दिगंबर नाचणकर यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने आर्यन क्लबच्या खेळाडूंना स्पर्धा खेळण्याचा अनुभव मिळणार आहे, असे श्री. तावडे यांनी सांगितले. तसेच राकेश चव्हाण यांनी खेळाडूंना शुभेच्छा देतानाच भविष्यात चांगले खेळाडू घडले पाहिजे, अशी आशा व्यक्त केली. या स्पर्धेसाठी सहकार्य करणार्या सौरभ मलुष्टे यांनीही स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेचा उद्घाटनीय सामना अत्यंत चुरशीचा झाला. यामध्ये लायन संघाने टायगर संघावर 1 गुणांनी विजय मिळवला. पहिल्या डावात मध्यंतराला टायगरकडे दोन गुणांची आघाडी होती. त्यानंतर लायन संघाने आक्रमण आणि संरक्षणात चांगली कामगिरी केली. त्यामुळे लायन संघाने हा सामना एक गुणांनी जिंकला.
आर्या डोर्लेकर, श्रावणी सनगरे, पायल पवार, अस्मी कर्लेकर यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला तर टायगरतर्फे साक्षी लिंगायत, मृण्मयी नागवेकर, दिव्या पालये यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. अन्य सामन्यात आर्यन लायन संघाने फायटर संघाचा 1 डाव 3 गुणांनी पराभव केला. फायटरतर्फे स्वरा मयेकर, तीर्था सावंत यांनी चांगला खेळ केला. तर तिसर्या सामन्यात आर्यन फायटरने आर्यन टायटनचा पराभव केला. यामध्ये टायटनतर्फे चिन्मयी विलणकर आणि सान्वी सुर्वेने चांगला खेळ केला. या सामन्यात स्वानंद आग्रे, शिवराम किनरे, राजेश कळंबटे, आरती कांबळे, ऐश्वर्या सावंत, माधवी बोरसुतकर, अपेक्षा सुतार यांनी पंच म्हणून काम पाहिले.