जिल्ह्यात जमीन आरोग्य पत्रिका अभियान, 100 गावांची निवड
रत्नागिरी : नव्याने सुरू होणार्या खरीप हंगामात यावर्षी राष्ट्रीय कृषी विकास (एनएडी) योजनेंतर्गत ‘जमीन आरोग्य पत्रिका अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील 100 गावांची निवड करून प्रत्येक गावातील 95 माती नमुने असे सुमारे साडेनऊ हजार नमुने संकलित करुन तपासण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुर्हाडे यांनी दिली.
गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण 3 हजार 756 माती नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये सर्वसाधारण 1 हजार 338, सूक्ष्म 51, विशेष नमुने 20, तर आठ पाणी नमुने तपासण्यात आले. 2022-23 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका अभियान राबविण्यात येत असून, त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील किमान 12 गावातून हे अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 100 गावात या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. या प्रत्येक गावातील 95 नमुने तपासण्यात येणार आहेत.
या अंतर्गत जिल्हा कृषी सहाय्यकामार्फत नमुने गोळा करण्याचे काम सुरू असून, माती नमुन्यांची तपासणी करुन संबंधित जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करण्यात येणार आहे या तपासणीमध्ये माती परीक्षण, सूक्ष्म मूलद्रव्यांची तपासणी, पाणी परीक्षण केले जाते. या तपासणीमध्ये शेतातील मातीचे नमुने घेऊन त्या मातीचा कस आजमावला जातो.
जमिनीचे भौतिक गुणधर्म तपासून त्यानुसार खतांच्या वापराबाबत योग्य त्या शिफारसी व उपाययोजना सुचविल्या जातात. त्यामुळे आवश्यक ती खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. खतांच्या खर्चात बचत होऊन अधिक फायदा होतो. आम्ल-विम्ल व क्षारयुक्त जमिनी सुधारून त्या पिकवाढीस योग्य करता येतात.