
रत्नागिरीतील जामा मशिद समोरच्या इमारतीत फ्रीजने घेतला पेट; नगर परिषदेच्या बंबाने आटोक्यात आणली आग
रत्नागिरी : बाजारपेठेतील झारणी रोड मार्गावरच्या जामा मशिदसमोरच्या इमारतीतील बंद सदनिकेतल्या फ्रीजला लागलेली आग रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने आटोक्यात आणली. या फ्रीजच्या कॉम्प्रेसरमधील वायू गळतीमुळे अग्निशमन दलाला कळवण्यात आले. अग्निशामक इमारतीजवळ आल्यानंतर सदनिकेच्या खिडकीची काच फोडून अग्निशामक जवान शेलार यांनी पाण्याचा मारा करून फ्रीजला लागलेली आग विझविली. फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होण्यापूर्वीच आग विझल्याने संभाव्य धोका टळला. दरम्यानच्या काळात महावितरणचे अभियंता मोडक यांनी लाईनमनला पाठवून येथील वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे अनर्थ टळला.