रत्नागिरी येथील ऍम्ब्युलन्स चालकाचा मिर्जापूर येथे अपघातात मृत्यू, अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी
रत्नागिरी निवखोल येथील ऍम्ब्युलन्स चालक फिरोज अकबर पावसकर (४०) याचा उत्तरप्रदेश मिर्जापूर येथे गुरुवारी पहाटे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.त्याच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी मिर्जापूरच्या दिशेने धाव घेतली.तर शनिवारी मृतदेह रत्नागिरी येथे दाखल होताच हजारोजन अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.दुपारी निवखोल येथील कब्रस्तानात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
फिरोज पावसकर हे गेले १५ वर्षे रत्नागिरीत ऍम्ब्युलन्स चालवत होते.अनेक रुग्णांची त्यांनी या माध्यमातून सेवा केली.गरीब रुग्णासाठी तर ते स्वतः पदरमोड करून सेवा देत होते.कोरोना काळात तर त्यांनी दिवसरात्र काम केले.त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यात देखील प्रसिद्ध होते.ऍम्ब्युलन्स चालक संघटनेत त्यांनी उत्तमप्रकारे काम करून महाराष्ट्र राज्यात नावलौकिक मिळवला होता.रत्नागिरीचे शासकीय रुग्णालय म्हणजे फिरोज पावसकर यांचे माहेरघर ठरले होते.२४ तास येथे रुग्णांना सेवा देण्यासाठी ते उपलब्ध असत.
मंगळवारी ते ऍम्ब्युलन्समध्ये मृतदेहाचे घेऊन बिहारसाठी निघाले होते.त्यांच्या बरोबर आणखी एक सारथी ड्रायव्हर देखील होता.बिहार येथे पोहचण्यापूर्वी १५० की.मी अगोदर उत्तरप्रदेश मिर्जापूर येथे त्यांच्या ऍम्ब्युलन्सला गुरुवारी पहाटे अपघात झाला.त्यावेळी फिरोज पावसकर हे बाजूला बसलेले होते.या अपघातात फिरोज पावसकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर चालक जखमी झाला आहे.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी बिहारच्या दिशेने धाव घेतली होती.तर अनेकजण मुंबई येथे थांबून होते.
मृत्यूतदेह पुणे मार्गे रत्नागिरीत आणण्यात येणार असल्याचे समजताच पुणे,सातारा,कराड आशा ठिकाणी अनेक ऍम्ब्युलन्स चालक थांबून होते.सर्वांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले शनिवारी सकाळी १०.३० वाजता मृतदेहाची शववाहिका रत्नागिरी डी मार्ट येथे दाखल झाली.तेथूनच अंत्ययात्रेला सुरुवात झाली.यावेळी रत्नागिरीतील वाहन चालक ऍम्ब्युलन्स चालक रिक्षा चालक यांच्यासह हजारो नागरिक सामील झाले होते.
दुपारी निवखोल येथील कब्रस्तानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.फिरोज पावसकर यांच्या पश्चात आई,वडील पत्नी दोन मुले,भाऊ असा मोठा परिवार आहे.फिरोज पावसकर यांचे यापूर्वी अनेकवेळा अपघात झाले होते.मात्र त्यातून ते सहीसलामत बचावले होते.मात्र यावेळी अखेर काळाने त्यांच्यावर झडप घातली.त्यांच्या निधनाने रत्नागिरीतील ऍम्ब्युलन्स व्यवसाय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.