रत्नागिरी मच्छिमार्केट येथे चरस विकताना अटल गुन्हेगार सलमान डांगे पोलिसांच्या जाळ्यात
रत्नागिरी : हातात अंड्याचे ट्रे आणि भाजीची पिशवी घेतली… डोक्यात गोल टोपी घातली… वेशांतर केले… पोलिस असल्याची पुसटशी कल्पनाही त्याला लागली नाही. वेशांतर केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर विश्वास ठेवून ‘तो’ही भुलला आणि चरस हा अमली पदार्थ विकणारा गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडला. ही कारवाई करण्यात आली आहे ती रत्नागिरीच्या मच्छीमार्केट परिसरात.
तीन दिवसांमध्ये सलग दुसर्यांदा शुक्रवारी दुपारी पोलिसांनी मच्छिमार्केट परिसरात कारवाई करून 80 ग्रॅम चरस जप्त केला. सलमान डांगे असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास पोलिस नाईक राहुल घोरपडे यांना मच्छिमार्केट परिसरात चरसची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. याबाबतची माहिती त्यांनी प्रभारी शहर पोलिस निरीक्षकांना दिली. त्यानंतर
ज्या ठिकाणी चरसची विक्री होत होती त्या ठिकाणी घोरपडे यांनी धाड टाकली आणि सलमान डांगेला जेरबंद केले. त्याच्याकडून ८० ग्रॅम चरस हस्तगत केले आहे. या कारवाईनंतर घोरपडे यांनी शहर पोलिसांच्या डीबी पथकाला याबाबत माहिती दिली.
सोमवारी मच्छिमार्केट परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली होती. एका संशयिताकडून अमली पदार्थ हस्तगत केले होते.