जिल्ह्यातील 2 हजार 800 अंगणवाड्या दोन वर्षानंतर गजबजल्या
रत्नागिरी : जिल्ह्यातील 2 हजार 800 अंगणवाड्यांमध्ये पुन्हा एकदा चिमुकल्यांचा किलबिलाट पहायला मिळाला. मागील दोन वर्षांपासून बंद असलेल्या अंगणवाड्या बुधवारपासून सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहाने बालकांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. मार्च 2019 मध्ये कोरोनामुळे प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालये व अंगणवाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अंगणवाडी सोडून सर्व सुरु करण्यात आले होते. अंगणवाड्या मात्र बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मे महिन्यात या अंगणवाड्या सुरु करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विभागाने घेतला होता. या अंगणवाड्या सुरु करण्याबाबत जिल्हा स्तरावर अधिकार देण्यात आले होते. जिल्ह्यातील परिस्थितीनुसार हा निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या
होत्या. त्यानुसार जिल्ह्यात 1 जूनपासून अंगणवाड्या सुरु करण्याचा निर्णय जि.प. ने घेतला. जिल्ह्यात 2 हजार 871 अंगणवाडी व मिनी अंगणवाडी आहेत. यामध्ये 40 हजार बालके शिक्षण घेत आहेत.