जिल्ह्यातली पहिली ग्रामपंचायत! विधवा प्रथा बंद करण्यासाठी दमामे तामोंड ग्रामपंचायतीचा ठराव
दापोली : दापोली तालुक्यातील दमामे-तामोंड ग्रुप ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करून यापुढे विधवा महिलांना समाजात मानाचे स्थान मिळेल, असा ठराव नुकताच केला आहे. असा ठराव करणारी ही जिल्ह्यातील पहिलीच एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे. येथील सरपंच गंगाराम हरावडे, ग्रामसेवक नामदेव जाधव आणि गावातील ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.
असा निर्णय या आधी कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने ग्रामसभेत घेतला होता. त्याचे राज्यभरातून कौतुक झाले. दरम्यान, आता या निर्णयाला शासन निर्णयाचे रूप प्राप्त झाले आहे. हेरवाड ग्रामपंचायतीच्या निर्णयाचा आदर्श समोर ठेवत राज्यात विधवा प्रथा बंद करण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. समाजात विधवा महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यांना मान-सन्मानापासून बाजूला ठेवले जाते. पतीच्या निधनानंतर तिच्या बांगड्या फोडल्या जातात, तिचे कुंकू पुसले जाते. ही विधवा प्रथा बंद व्हावी व त्या महिलांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी हा ठराव करण्यात आला आहे.
राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श समोर ठेवत आपापल्या गावात विधवा प्रथा बंद करण्यासाठी पावले उचलावीत, असे परिपत्रक राज्य सरकारने जारी केले आहे. 17 मे रोजीच्या या निर्णयाचे स्वागत करीत दमामे-तामोंड गावातील ग्रामस्थ -महिलांनी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव एकमताने नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत मंजूर केला. या ठरावाचे स्वागत दापोली तालुक्यातून केले जात आहे.