
पोलिस असल्याचे सांगत मंगळसूत्र आणि बांगड्या लांबवणाऱ्याला रत्नागिरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पोलिस कोठडीत रवानगी
रत्नागिरी : पोलिस असल्याचे सांगत महिलेकडून मंगळसूत्र आणि सोन्याच्या बांगड्या घेऊन 1 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज घेऊन फसवणूक करणार्या तोतया पोलिसाला शहर पोलिसांनी बुधवारी बेड्या ठोकल्या आहेत. शब्बीर जावेद जाफरी (वय 34, मूळ रा. लोणी काळभोर हवेली, पुणे सध्या रा. परळी वैजनाथ, बीड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. फसवणुकीची ही घटना 7 मे रोजी सायंकाळी रत्नागिरीतील धन्वंतरी हॉस्पीटलजवळच्या वॉश सेंटरजवळ घडली होती. याबाबत श्रद्धा शिवाजी पावसकर (वय 62, रा. आरोग्य मंदिर, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. आरोग्य मंदिर ते नरहर वसाहतीकडे चालत जात असताना दोघांनी त्यांना
आपण पोलिस असल्याचे सांगितले. पावसकर यांच्याकडील मंगळसूत्र व सोन्याच्या 2 बांगड्या घेऊन बदल्यात धातूच्या बांगड्या कागदात बांधून दिल्या. याप्रकरणी शहर पोलिसांनी तोतया पोलिसाला अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता 6 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.