तळगाव येथे जमिनीच्या वादातून दोन भावांत मारहाण

राजापूर  : तालुक्यातील तळगाव कासारवाडी येथे दोन भावात सामायिक जमिनीच्या वादातून मारहाण झाल्याची घटना घडली असून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संजना बेलवलकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती शिवानंद बेलवलकर व दीर गजानन बेलवलकर यांचे सामायिक घर असून एकाच घरामध्ये ते विभक्त राहतात. फिर्यादी घरामध्ये नसताना गजानन बेलवलकर, प्रशांत बेलवलकर या दोघांनी सार्वजनिक गणपतीचे साहित्य घराबाहेर फेकून दिले. याचे कारण बेलवलकर यांनी विचारत ‘जसं सामान बाहेर फेकलं तसं आतमध्ये आणून ठेवा’ असं सांगितले. याचा राग येऊन गजानन व प्रशांत यांनी शिवीगाळ करत शिवानंद यांची मान पकडली. पतीला मारहाण होत असताना संजना या सोडवण्यासाठी गेल्या असता गजानन याने हातातील दांडक्याने मारहाण केली. यामध्ये पती-पत्नी जखमी झाले. संजना यांनी राजापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गजानन बेलवलकर, प्रशांत बेलवलकर यांच्या विरूध्द  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्‍या बाजूने गजानन बेलवलकर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पूर्वीचा राग मनात धरून आम्ही साहित्य घराबाहेर टाकले, असा गैरसमज करून घेत आम्हाला मारहाण केली, असे म्हटले आहे. गजानन बेलवलकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवानंद बेलवलकर, संजना बेलवलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button