
मासिक पाळीच्या जनजागृतीसाठी सीईओ डॉ. जाखड यांचा उपक्रम
रत्नागिरी : मासिक पाळीविषयी गैरसमज दूर करण्यासासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी एक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत 500 हून अधिक शालेय मुलींकडून घरोघरी जाऊन जनजागृती केली जाणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी शनिवार (28 मे) पासून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सुमारे 1 हजारहून अधिक शाळांचा या उपक्रमामध्ये समावेश आहे. प्रत्येक शाळेतील दर महिन्याला 2 मुली प्रेरक म्हणून निवडल्या जाणार आहेत. त्या नंतर या मुली शिक्षक, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने जनजागृती केली जाणार आहे. मुलींचे आहार आणि मासिक पाळी याविषयी मार्गदर्शन वर्ग घेण्यात येणार आहेत. तसेच हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक शाळेमध्ये कपडे बदण्याच्या रूमची संकल्पना, मासिक पाळीवेळी शाळेतील होणारी गळती थांबवण्यासाठी एक प्रकल्प हाती घेत आहोत, असे डॉ. जाखड यांनी पत्रकारांना सांगितले. अपंगत्वामुळे मासिक पाळीचे सुयोग्य व्यवस्थापन करू न शकणार्या दिव्यांग मुली व महिलांना, काळजी वाहकांना प्रशिक्षण देणेे, दिव्यांग मुली व महिलांच्या आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशिक्षणासोबतच सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करणे, दिव्यांग मुली व महिलांना मासिक पाळी विषयीचे महत्त्व व गरज यावर संवाद साधणे याचे नियोजन तयार करून दिले आहे.