
अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३३ वे राष्ट्रीय अधिवेशन १६ व १७ जानेवारी रोजी कणकवलीत
अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३३ वे राष्ट्रीय अधिवेशन १६ व १७ जानेवारी रोजी कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. तळ कोकणात होणारे हे परिषदेचे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन असून यामध्ये अखिल भारतातून सुमारे ३५० अभ्यासक आणि प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या अध्यक्षा डॉ. अरुणा मोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.कणकवली महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे हे परिषदेचे मुख्य आयोजक आहेत, तर इतिहास विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ कदम हे स्थानिक संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
डॉ. अरुणा मोरे यांनी सांगितले की, या राष्ट्रीय अधिवेशनात प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक अशा तीन सत्रांमध्ये शोधनिबंध सादर केले जातील. इतिहास परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरणही यावेळी होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, प्रसिद्ध अभ्यासक डॉ. अशोक राणा (यवतमाळ) आणि इतिहास संशोधक डॉ. जी.डी. खानदेशे यांना प्रसिद्ध इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार व अन्य मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दुबई येथूनही प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.




