
खेड शहरातील कन्या शाळेची दुरवस्था, लाल फितीत अडकला दुरुस्तीचा प्रस्ताव
——————————–
खेड : खेड शहरातील कन्या शाळेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव लालफिती कारभारात अडकला असल्याने यावर्षी देखील या शाळेतील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून अभ्यासाचे धडे गिरवावे लागणार आहेत. शहरातील कन्या शाळेच्या दोन्ही इमारती मोडकळीच्या उंबरठ्यावर असल्याने पावसाळ्यात जर दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचवावा यासाठी शासनाचे वेगवेगळे प्रयत्न सुरु असतानाच नादुरुस्त शाळांच्या दुरुस्तीबाबत असलेली उदासीनता विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारत येत नाही.
खेड शहरातील कन्या शाळा ही दोन इमारतींमध्ये विभागली असून या शाळेत अनेकांनी श्री गणेशा गिरवलेला आहे. या शाळेतील अनेक विद्यार्थी आज देशभरात काही परदेशात उच्चपदस्थ म्हणून कार्यरत आहेत. अनेकांचे आयुष्य घडविणाऱ्या कन्या शाळेच्या दोन्हीही इमारती गेल्या काही वर्षांपासून अखेरच्या घटका मोजत आहेत अतिशय धोकादायक झालेल्या या दोन्ही इमारतींच्या डागडुजीसाठी खेड शिक्षण विभागाचा प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठविण्यात आला आहे. मात्र हा प्रस्ताव लालफिती कारभारात धूळ खात पडला असल्याने शाळा इमारतींची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.
शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या शाळेच्या दोन इंमारतींमध्ये आठ वर्गखोल्या असून सद्यस्तीतीत या ठिकाणी पहिली ते चौथिचे ३१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या काही वर्षात शाळेच्या इमारतींची डागडुजी न केली गेल्याने शाळेची दुरवस्था झाली आहे. या धोकादायक इमारतीमध्ये आपल्या मुलांना कशी पाठवावी हा प्रश्न पालकांना पडला असून याचा परिणाम शाळेच्या पटसंख्येवर झाला आहे. दरवषी येथील पटसंख्येला गळती लागली असल्याने काही वर्षांपूर्वी १०० हुन अधिक पट असलेल्या शाळेचा आताच पट हा केवळ ३१ विद्यार्थ्यांचा आहे.
कन्या शाळेच्या इमारती धोकादायक असतानाच पावसाळ्यात या शाळेला पुराच्या पाण्याचा शाप आहे. अतिवृष्टीतदारमयन नारिंगी नदीचे पाणी या शाळेला विळखा घालत असल्याने पावसाळ्यात अनेकदा शाळा बंद ठेवावी लागत आहे. प्रशासनाने मनात आणले तर शाळांच्या इमारतींची दुरुस्ती आणि पुराच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. मात्र प्रशासन याबाबत कमालीचे उदासीन असल्याने कन्या शाळेवरील संकटं दिवसेंदिवस गडद होत चालले आहे.
कन्या शाळेच्या इमारतीं धोका दायक झाल्याने खेड शिक्षण विभागाने याबाबत शासनाकडे अहवाल पटवला आहे. मात्र प्रशासनाकडून प्रस्तावाची दखल घेतली जात नसल्याने शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीवाचा धोका वाढतच चालला आहे.
www.konkantoday.com