पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज
रत्नागिरी : पावसाला सामोरे जाण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. जोखीमग्रस्त व नदीकाठची अशी एकूण 58 गावांवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे. जिल्ह्यातील जोखीमग्रस्त 27 गावे आणि नदीकाठची 31 गावे आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. या गावांमध्ये पावसाळ्यात साथीचा उद्रेक वाढू नये, यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. यापूर्वी जिल्ह्यात साथरोगांनी डोके वर काढलेल्या गावांमध्ये आरोग्य विभागाच्या यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.1 जूनपासून या गावांवर आरोग्य विभागातर्फे विशेष लक्ष ठेवण्यात येणार
आहे. जिल्ह्यात मागील तीन वर्षात डेंग्यू, चिकुनगुनिया, गॅस्टो, अतिसार, कॉलरा, ताप उद्रेक हिवताप, काविळ, लेप्टोस्पायरोसिस आदी साथींचा प्रादुर्भाव झालेल्या गावांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी संभाव्य पूरग्रस्त ठिकाणी तत्काळ भेट देऊन उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
जिल्हास्तर व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी औषधसाठा उपलब्ध असून ईमर्जन्सी किट तयार केली आहेत. डॉ. श्रीम मिताली मोडक यांची जिल्हा साथ नियंत्रण वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्याही गावात वाडी वस्त्यांमध्ये साथरोगांची लागण झाल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले
आहे. गेल्या 3 वर्षात जिल्ह्यात साथ उद्रेक गावांमध्ये दापोली-हर्णे, पाज (साथ-विषमज्वर), खेड- खेड शहर, मुसाड, सवेणी (साथ-काविळ, डेंग्यु), चिपळूण- कोसबी, कातळवाडी, टेरव, डेरवण (गोवर, अतिसार, काविळ), रत्नागिरी-खानू, जयगड (कॉलरा, डेंग्यु), राजापूर- सोलगांव (गॅस्ट्रो) यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील जोखीमग्रस्त गावांमध्ये मंडणगड-पेवे, पणदेरी, अडखळ, निगडी, केंगवळ, गोठे टाकेडे, दापोलीत -निरंक, खेड-सार्पिली, कशेडी, सुमारगड, गुहागर-पाचेरीसडा, कुडली, चिपळूण-तोंडली, पातेपीलवली, वीर, धामणवणे, संगमेश्वर-पूर्ये परिधामापूर, रत्नागिरी-निरंक, लांजा-कुरंग, कोंडगे, विलवडे, माचाळ, चिंचूरटी, कोलधे तर राजापूर तालुक्यातील मोगरे, तिवरे, कार्जिडा या गावांचा सामवेश आहे. जिल्ह्यातील साथींच्या पार्श्वभूमीवर नदीकाठी असलेल्या गावांमध्ये खेड-सुसेरी, खेड बाजारवाडी, गुहागर-तवसाळ पडवे, चिपळूण-खेर्डी, वालोपे, मजरेकाझी, कुटरे, चिपळूण शहर, संगमेश्वर-नावडी, बाजारपेठ, कुरधुंडा, वांद्री, कोळंबे, डिंगणी, फुणगूस बाजारपेठ, करजुवे, रत्नागिरी-हरचेरी, टेंभ्ये, तोणदे, सोमेश्वर, हातीस, चांदेराई, लांजा-निवसर, साटवली, राजापूर-राजापूर शहर, सोगमवाडी, गोवळ, शिवणे, दसूर, रायपाटण, तळवडे या गावांचा समावेश आहे.