दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना होणार 30 मेपासून साहित्य वाटप
रत्नागिरी : खा. विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने दिव्यांग लाभार्थी व ज्येष्ठ नागरिकांसाठी तपासणी शिबिर पार पडले होते. यावेळी शिफारस केलेल्या लाभार्थ्यांना साहित्य वाटपासाठी डॉक्टर व तज्ज्ञांचे पथक दि. 30 मे पासून रत्नागिरी जिल्हा दौर्यावर येत असून लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकार्यांनी केले आहे. खा. विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालय आणि जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद आणि आस्था सोशल फाऊंडेशनच्यावतीने नुकतेच गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापुरातील दिव्यांग लाभार्थी व ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबिरे आयोजित करण्यात आली होती. यावेळी लाभार्थ्यांची तपासणी करुन त्यांना साहित्यासाठी शिफारस करण्यात आली होती. हे साहित्य वाटप करण्यासाठी अलिम्को कंपनीच्या डॉक्टरांचे व तज्ज्ञांचे पथक रत्नागिरी जिल्हा दौर्यावर येत असून गुहागर येथे 30 मे रोजी पाटपन्हाळे हायस्कूल, चिपळुणात 31 मे रोजी पंचायत समिती चिपळूण, संगमेश्वरमध्ये 1 जून रोजी पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल साडवली देवरूख येथे लाभार्थ्यांनी उपस्थित राहायचे आहे. सकाळी 10 ते सायं. 4 वाजेपर्यंत लाभार्थ्यांनी आपल्या साहित्याचा ताबा घ्यायचा असून यावेळी सोबत मूळ पावती व आधार कार्ड सोबत आणवयाचे असल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकार्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.