सावर्डे येथे वृद्ध आईला मारहाण; मुलगा, सुनेविरोधात गुन्हा
सावर्डे : वृद्ध आईला मारहाण करणार्या मुलाविरोधात आणि शिविगाळ करणार्या सुनेविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे नुकतीच ही घटना घडली. या घटनेत वृद्ध महिलेच्या हाताला आणि कमरेला मार लागला असून त्यांच्यावर कामथे येथील बाळासाहेब माटे उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी श्रीमती शफिया अब्दल्ला तांबे (वय 70, रा. सावर्डे) यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, की शेजारीच राहणारा मुलगा असलम अब्दल्ला तांबे याच्या मुलाला घरासमोरील कचरा जाळू नकोस, असे सांगितले. याचा राग मनात धरून मुलगा असलम अब्दल्ला तांबे याने आपणास मारहाण केली आणि सून शबाना असलम तांबे हिने शिविगाळ केली. तसेच मुलगी नाझिया अजिम काझी हिला असलम तांबे याच्या मुलाने शिविगाळ केली. श्रीमती शफिया तांबे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी असलम तांबे, शबाना तांबे आणि त्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.