गणपतीपुळे, पावस संस्थानला निर्धोक प्रसाद वाटपाचे प्रमाणपत्र
रत्नागिरी : जिल्ह्यातील गणपतीपुळे व पावस संस्थानाला स्वच्छ व गुणवत्तापूर्ण प्रसाद वाटपासाठी प्रमाणपत्र गेल्या एप्रिल महिन्यात प्राप्त झाले आहे.
जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांपैकी असलेले संस्थान श्रीदेव गणपतीपुळे व स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस येथे वर्दळ असते. त्यामुळे अशा धार्मिकस्थळांकडे येणार्या भाविकांना चांगल्या दर्जाचा प्रसाद मिळावा व त्यांच्या आरोग्याला कोणताही अपाय होऊ नये, शिवाय निर्धोक प्रसाद वाटप व्हावा, या उद्देशाने अन्न सुरक्षा मानके प्राधिकरण नवी-दिल्ली यांचा उपक्रम रत्नागिरीच्या अन्न व औषध प्रशासन यांच्यावतीने राबवला.
यात संस्थानांना वेळोवेळी अन्न व औषध प्रशासन रत्नागिरीच्यावतीने आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर संस्थानांनी आपापल्या प्रसादाचे नमुने तपासणी व ठरवलेल्या मानांकनावर आधारलेले आहेत की नाही, यासाठी पाठवले. यानंतर एप्रिल 2022 मध्ये प्रसाद वाटपासाठी प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रमाणपत्राची 30 एप्रिल 2024 पर्यंत मुदत आहे. दरम्यानच्या काळात वेळोवेळी थर्ड पार्टीच्यावतीने पावस व गणपतीपुळेत निरीक्षण केले जाणार आहे.
आपला जिल्हा धार्मिक स्थळांसाठी प्रसिध्द आहे. हे ध्यानात ठेऊन येणार्या काळात पावसाळ्याच्या कालावधीत गणेशोत्सवात परत अशाच प्रकारचा उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध संस्थानांना निर्धोक प्रसाद वाटपासाठी उद्युक्त केले जाणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त दिनानाथ शिंदे यांनी दिली.