
रत्नागिरी जिल्ह्यातील पाच शाळा अनधिकृत; 1 लाख रुपयांचा दंड आकारण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश
रत्नागिरी : जिल्ह्यात एकूण 5 अनधिकृत शाळा असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. कोणतीही अनधिकृत शाळा सुरू असल्यास संबंधित शाळेच्या व्यवस्थापनास 1 लाख रुपये इतका दंड व सूचना देऊनही शाळा बंद न केल्यास प्रतिदिन 10 हजार रुपये इतका दंड ठोठावण्यात यावा, असा आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी 20 मे रोजी दिला. त्यामुळे अनधिकृत शाळांना चाप बसणार आहे. शाळांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, अनधिकृत शाळांची यादी शासन संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशी मागणी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे करण्यात आली होती. सुरज मांढरे यांनी प्राथमिक व माध्यमिक संचालकांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याची दखल घेऊन संचालक दिनकर टेमकर यांनी सर्व शिक्षणाधिकारी यांना निर्देश दिले आहेत. अनधिकृत शाळेमध्ये आपल्या पाल्यासाठी प्रवेश घेऊ नये, सदर शाळेमध्ये प्रवेश घेतल्यास आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होईल, अशी स्पष्ट सूचना असलेला बोर्ड शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.