बँक, रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था हवी- अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे


रत्नागिरी, दि. 22 ):- बँक, रुग्णालय तसेच शासकीय कार्यालयांमध्ये गर्दीच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे रहायला लागू नये, त्यांच्याकरिता स्वतंत्र बैठक व्यवस्था हवी. तशी सूचना संबंधितांना पत्रव्यवहार करुन कळवावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी दिले.
जिल्हास्तरीय ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. बैठकीला समाजकल्याण सहायक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डाॕ भास्कर जगताप, इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक उदयसिंह गायकवाड, बहुजन कल्याण अधिकारी अपूर्वा कारंडे, सहायक पोलीस निरीक्षक शबनम मुजावर, प्र. जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील, जिल्हा परिविक्षा अधिकारी ए. बी. शिंदे, रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ आदी उपस्थित होते.
सहायक आयुक्त श्री. घाटे यांनी विषय वाचन केले. श्री. थरवळ यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या सांगितल्या. अपर जिल्हाधिकारी श्री. गलांडे म्हणाले, दर तीन महिन्याला जिल्हास्तरीय ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीची बैठक घ्यावी. पोलीस विभागाने ज्येष्ठ नागरिक सुरक्षा समिती स्थापन करावी. ही समिती स्थापन केली असल्यास तशी माहिती समितीला द्यावी. त्याची प्रसिद्धी करावी. रत्नागिरी नगरपालिकेने ज्येष्ठ नागरिक संघासाठी भूखंड देण्याबाबत कार्यवाहिची माहिती द्यावी. तसेच पदपथ आणि अरुंद रस्त्यांवरील फेरीवाले, हातगाडीवाले, भाजीविक्रेते यांना हटवून ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित व भयमुक्त चालण्यासाठी कार्यवाही करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button