राजापुरात २९ मे रोजी रिफायनरी प्रकल्प स्वागत मेळाव्याचे आयोजन
राजापूर : तालुक्यात धोपेश्वर- बारसू, गोवळ परिसरात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला आता अंतिम स्वरूप आले आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून याबाबत आता सकारात्मक निर्णय होणार असून हा प्रकल्प राजापुरात उभारण्याबाबत आता हिरवा कंदील मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर राजापुरात भाजपाच्या राजापूर विधानसभा मतदार संघाच्या वतीने रविवारी २९ मे रोजी रिफायनरी प्रकल्प स्वागत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तशी माहिती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार प्रमोद जठार यांनी सोमवारी राजापुरात पत्रकार परिषदेत दिली. रविवारी २९ मे रोजी सायंकाळी ४ वाजता राजापूर शहरातील गुजराळी येथील श्री मंगल कार्यालयात हा स्वागत मेळावा होणार आहे.
या रिफायनरी प्रकल्प स्वागत मेळाव्याच्या माध्यमातून रिफायनरी प्रकल्पाबाबत असलेले गैरसमज दूर करतानाच या प्रकल्पाच्या माध्यमातून काय हवे आणि काय झाले पाहिजे, याची चर्चा करून तशा मागण्यांचा अहवाल एक शिष्टमंडळ केंद्रीय उद्योगमंत्री नारायण *राणे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पेट्रोलिअयम मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन त्यांना देणार असल्याचेही जठार यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुका अध्यक्ष अभिजित गुरव, महिला उद्योजिका उल्का विश्वासराव, संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रुती ताम्हणकर आदींसह राजापूर, लांजा व संगमेश्वर भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. भाजपाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने या प्रकल्पाबाबत जनतेमध्ये जनजागृती करून या प्रकल्पाचे महत्व जनतेला पटवून द्यावे, असे आवाहनही यावेळी जठार यांनी केले.