
धामणसे येथे भरधाव कारच्या धडकेत वृद्धा ठार, चालक कारसह फरार
रत्नागिरी : बेदरकारपणे कार चालवून पादचारी वृद्धेला धडक देत तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार 22 मे रोजी सायंकाळी 4.50 वा. गणपतीपुळे ते चाफे रस्त्यावरील धामणसे येथे घडली आहे. या अपघातात सुलोचना तुकाराम सांबरे (वय 65, धामणसे सांबरेवाडी, रत्नागिरी ) यांचा मृत्यू झाला आहे. तर याबाबत अशोक बाळाजी सांबरे (वय 44, राहणार धामणसे सांबरेवाडी, रत्नागिरी ) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, रविवारी सायंकाळी सुलोचना सांबरे धामणसे सांबरेवाडी ते गणपतीपुळे अशा चालत जात होत्या. त्याचवेळी स्विफ्ट डिझायर कार (एमएच-08-बीएन-5531) वरील अज्ञात चालक भरधाव वेगाने गणपतीपुळे ते चाफे असा समोरून येत होता. त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने रस्त्याच्या विरुद्ध बाजूला येऊन सुलोचना सांबरेंना धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला आणि दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर चालक कारसह पळून गेला असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शेळके करत आहेत.