ओणी- अणुस्कुरा मार्गासाठी 7 कोटी 44 लाखांचा निधी मंजूर होऊनही काम रखडले; खड्डे बुजवण्यास सुरुवात
ओणी-अणुस्कुरा मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे. पावसाळ्यापूर्वी संपूर्ण मार्गावरील खड्डे बुजवून होतील का? याबाबत शंका निर्माण झाली आहे. गतवर्षी पावसाळ्यात खराब झालेल्या ओणी-अणुस्कुरा मार्गाच्या दुरुस्तीला उन्हाळ्यात मुहूर्त सापडला नाही. 7 कोटी 44 लाखांचा निधी उपलब्ध होऊन देखील मार्ग दुरुस्तीचे काम अंतर्गत राजकारणात अडकले. त्यातूनच हे प्रकरण न्यायप्रविष्ठ बनल्याने उन्हाळा संपत आला तरी कामाला सुरुवात झालेली नव्हती. मात्र संपूर्ण रस्त्यात आणि अणुस्कुरा घाटाची एकूणच विदारक स्थिती पाहता संबंधित बांधकाम विभागाने निविदा मंजूर झालेल्या ठेकेदाराकडून तूर्तास पडलेले खड्डे भरायला सुरुवात केली आहे. पावसाळा अल्पावधीत सुरू झाल्यास भरलेले खड्डे किती दिवस टिकणार? असा सवाल व्यक्त होत आहे.