उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांच्या पुढाकाराने मारूती मंदिर सर्कलमध्ये शिवसृष्टी अवतरणार ,पर्यटकांना नवे आकर्षण
रत्नागिरी शहराची प्रमुख ओळख असलेले मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा व आजुबाजूच्या परिसराच्या सुशोभिकरणाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. शनिवारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी या ठिकाणी येवून पाहणी केली.
शहराच्या या मध्यवर्ती ठिकाणी लवकरच शिवसृष्टी अवतरणार आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी शहराची ओळख असलेल्या ठिकाणांच्या सुशोभिकरणाकडे विशेषत्वाने लक्ष दिले आहे. त्यासाठी मुंबईतील नामांकीत कॉलेज जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या वरिष्ठ प्राध्यापकांशी चर्चा केली आणि त्यातून नवनव्या कल्पना साकारल्या. त्यातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसर सुशोभित करण्यात आला आहे. आता मारूती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यालगतचा परिसर सुशोभित केला जात आहे. मारूती मंदिरलाही जे. जे. चे विद्यार्थीच हे काम करत आहेत. तेथील २० विद्यार्थी गेले सात महिने हे काम करीत आहेत. आता हे काम पूर्णत्वाला येत आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या आसपास ४ घोडेस्वार, २ हत्ती, २२ मावळे, ४ तोफा अशी शिवसृष्टी मारूती मंदिरला साकारत आहे. मावळ्यांच्या हातात भाला, तुतारी काठी आहेत. काही मावळे घेड्यावर बसले आहेत. याच भागात रायगड सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग असे चार किल्ले साकारले जात आहेत. हे सर्व फायबरपासून बनवण्यात आले असून ते तयार करण्यासाठी ७ ते ८ महिने या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. www.konkantoday.com