
महामार्गावर भरणे नाका येथे वाहतूक कोंडी; चाकरमानी, पर्यटक त्रस्त
खेड : कोकणात येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. पर्यटकांमध्ये वाढ झाली असली तरी राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट राहिलेल्या चौपदरीकरण कामामुळे भरणेनाका येथे वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी शनिवारी व रविवारी वाहनांच्या मोठ्या रांगा लागत असून ही समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी दि. २१ रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजण्याच्या दरम्यान भरणे नाका या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. यावेळी सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही समस्या आठवड्यातून शनिवारी व रविवारी सकाळी नेहमी दिसून येते. पर्यटकांच्या गर्दीमुळे महामार्ग देखील गर्दीने फुलून गेला असून रात्रंदिवस महामार्गावरील रहदारी पाहायला मिळत आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी पुलांचे देखील काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. सर्विस रोड अरुंद असून पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे भरणे नाका या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.