
राजापूर तालुक्यासाठी ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका
राजापूर तालुक्यासाठी ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिकेची गरज ओळखत विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांनी अद्ययावत रुग्णवाहिका राजापूर तालुक्यासाठी दिली. याचे लोकार्पण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे झाले.
राजापूर तालुक्यातील मोठा भाग हा दुर्गम असून याठिकाणी चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांना रत्नागिरी, मुंबई, कोल्हापूर येथे हलवताना नातेवाईकांची मोठी कसरत होते. ही बाब लक्षात घेऊन भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिकेची कल्पना मांडली होती. त्यानुसार आमदार निधीमधून निरंजन डावखरे यांनी राजापूरसाठी रुग्णवाहिका दिली. या लोकार्पण सोहळ्याला भाजपाचे राजापूर तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, सरचिटणीस अॅड. सुशांत पवार, मोहन घुमे, महिला तालुकाअध्यक्ष श्रृती ताम्हणकर, अनुजा पवार, रमेश आंब्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अभिजीत गुरव यांनी आ. डावखरे यांचे विशेष आभार मानले.