
पूर्णगड पोलिस ठाण्यातील अवघ्या 15 कर्मचार्यांवर सागरी सुरक्षेचा भार
रत्नागिरी : तालुक्यातील पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यात केवळ 15 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना जबाबदारी सांभाळताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पूर्वी 22 गावांचा कारभार पावस दूर क्षेत्राच्या माध्यमातून चार कर्मचारी कारभार सांभाळत होते. मात्र त्याचा अतिरिक्त भार रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याकडे वर्ग केला जात असे. मात्र सन 2013 मध्ये पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याची नव्याने स्थापना करण्यात आली जेणेकरून गोळप ते नाटे हा सागरी किनारा दहशतवादी संघटनांपासून सुरक्षित राहील. सुरूवातीच्या काळात पुरेसा कर्मचारी वर्ग कायमस्वरूपी असायचा, परंतु सध्या केवळ 15 कर्मचारी या सागरी पोलिस ठाण्याचा कारभार सांभाळत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या कर्मचार्यांना उलट-सुलट ड्युटी करून कारभार सांभाळावा लागत आहे. काहीवेळा येथील कर्मचारी अन्य ठिकाणी कामगिरीवर पाठविले जातात. त्यामुळे सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र दिसत आहे. याकडे संबंधित अधिकार्याने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.