कोकणातील जल संधारणाचा मोठा प्रकल्प पाचाड गावात
दरवर्षी उदभवणार्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी चिपळूण तालुक्यातील पाचाड गावाने कंबर कसली आहे. सह्याद्री निसर्गमित्र, पाचाड ग्रामपंचायत व निवृत्त सुभेदार मेजर जयंत कानडे यांच्या सहयोगातून या वर्षीपासून पाणी टंचाई हद्दपार करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनी पाहिलेल्या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी जल संधारण मोहीम हाती घेण्यात आली असून तिचा शुभारंभ सोमवार दि. १६ मे रोजी करण्यात आला. विशेष म्हणजे कोकणातील हा सर्वात मोठा प्रकल्प असून या माध्यमातून पाचशे सी.सी.टी. व डीप सी.सी.टी. यांची निर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प अन्य गावांसाठी ही आयडॉल ठरणार आहे.
कोकणात दरवर्षी मार्च महिन्यानंतर अनेक गावांमध्ये पाणी टंचाई भेडसावत असते. चिपळूण शहरापासून केवळ दहा कि.मी. अंतरावर असलेले पाचाड गावदेखील याला अपवाद नाही. गावात दरवर्षी एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाई जाणवू लागते. उन्हाळा वाढू लागतो तशी पाणी टंचाई देखील तीव्र होवू लागते. मे महिन्यात तर गावात आठवड्यातून एकदा नळाला पाणी येते पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त शेती, जनावरे व अन्य उपयोगासाठी देखील पाणी उपलब्ध होत नाही. पाणी मिळण्यासाठी महिला व मुले यांची वस्तीपासून दूर असलेल्या विहिरीवर वणवण करावी लागते. अशा परिस्थितीत गप्प न बसता यावर्षी पाणी टंचाईला हद्दपार करण्याचा निर्णय पाचाड ग्रामस्थांनी केला आहे. त्यानुसार या मोहिमेचा शुभारंभ सुभेदार मेजर जयंत कानडे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी सह्याद्री निसर्ग मित्रचे अध्यक्ष भाऊ काटदरे, प्रकल्प अधिकारी सागर रेडीज, पाचाड ग्रामपंचायत सरपंच नरेश घोले, उपसरपंच रमेश सुर्वे, नितीन नार्वेकर, गजानन सुर्वे, सौ. आशा गुरव व ग्रामस्थ उपस्थित होते.
पाचाड गावातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी काय करता येईल अशी विचारणा ग्रामस्थांनी सह्याद्री निसर्ग मित्रकडे केली होती. या संदर्भात संस्थेकडून पाणीप्रश्नाचा अभ्यास करण्यात आला. विहिरींची पाणी पातळी, उपसा, भौगोलिक बाबी या सर्व गोष्टींचे सर्वेक्षण करून कंटीन्यूअस कंटूर ट्रेंचेस (सीसीटी) बांधावेत असे सर्वानुमते ठरवण्यात आले. मात्र यासाठी निधीची आवश्यकता होती. निधी अभावी हा प्रकल्प थांबू नये यासाठी निवृत्त सुभेदार मेजर जयंत कानडे यांनी आर्थिक पाठबळ देत या सामाजिक कार्यात मोठा वाटा उचलला. विशेष म्हणजे श्री. कानडे यांनी आपल्या निवृत्ती वेतनाच्या रक्कमेतून साठवलेला निधी देणगी स्वरूपात दिला. निधीची पूर्तता होताच सह्याद्री निसर्ग मित्र आणि ग्रामस्थ यांनी हायड्रोमार्कर या उपकरणाच्या सहाय्याने समपातळी रेषा आखून घेतल्या आहेत. व त्यानुसार सीसीटी निर्मितीच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली असून एकूण ५०० सीसीटी व डीप सीसीटीची निर्मिती करण्यात येणार आहे. www.konkantoday.com