लांजात जमिनीच्या वादातून भावाभावात हाणामारी
लांजा : शहरातील पुरातवाडी येथे दोन भावांमध्ये झालेल्या हाणामारीत दोघेजण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत परस्परविरोधी तक्रारी करण्यात आल्या असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलोपार्जित जमिनीमध्ये बांधकाम करत असल्याची तक्रार दिल्याने याचा मनात राग आल्याने दोन कुटुंबात बाचाबाची व त्यानंतर हाणामारी झाल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा पुरातवाडी येथे घडलेल्या घटनेप्रकरणी अमित अरविंद पुरात आणि अनिल पुरात यांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. अमित पुरात यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, वडिलोपार्जित जमिनीचा कोर्टात वाद सुरु असताना अनिल पुरात हे या जागेमध्ये अनधिकृतपणे बांधकाम करत होते. याबाबत रीतसरपणे लांजा नगरपंचायतीमध्ये तक्रार केल्यानंतर संबंधित नगरपंचायतीने अनिल पुरात यांना बांधकाम थांबविण्याची नोटीस बजावली होती. याचा राग मनात निर्माण झाल्याने अनिल पुरात व त्यांच्या कुटुंबीयांनी अमित पुरात यांच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याचे म्हटले आहे. तर दुसर्या बाजूला अनिल पुरात यांनी आपल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, आपण बांधकाम करत असताना या ठिकाणी अमित पुरात व त्यांचे कुटुंबीय येऊन जबरदस्तीने मारहाण करून काम बंद करण्याचा प्रयत्न केला.