वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
चिपळूण : शहरातील गोवळकोट भोईवाडी येथील तरुणाने वाशिष्ठी नदीत उडी घेतल्याची घटना शनिवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी करंबवणे परिसरातील दिवा बेटालगत सापडला. रमेश सीताराम कासेकर (वय 40) असे या तरुणाचे नाव आहे. त्याने गोवळकोट-भोईवाडी येथील जेटीच्या ठिकाणी वाशिष्ठी नदीत उडी मारली होती. तेव्हा त्याला एका मुलीने पाहिले आणि तिने हा प्रकार शेजार्यांना सांगितला. त्यानंतर त्याचा बोटीच्या सहाय्याने तीन दिवस शोध घेण्यात आला. मात्र, वाशिष्ठी नदीला पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. अखेर मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्यावर गोवळकोट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.