राजापुरातील गाळाचा प्रश्न प्रलंबित; दरवर्षी पूरस्थिती आणि पाणीटंचाई
राजापूर शहरातील अर्जुना व कोदवली नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साठला असून, त्याचा फटका पुराबरोबरच पाणीटंचाईच्या रुपाने शहरवासीयांना बसू लागला आहे. त्यामुळे या नद्यांतील गाळ उपशाचा प्रश्नाने आता पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे.
पावसाळ्यात घराघरात पाणीच पाणी आणि उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण अशी स्थिती राजापूर शहराची पहावयास मिळाली आहे. याला मुख्य कारण शहरातील नदी पात्रातील साचलेला गाळ हेच आहे. शहराला त्रासदायक ठरणारा गाळ उपसण्याचा कामाला यापूर्वी मान्यता मिळाली आणि सन 2009 मध्ये गाळ उपसण्याचे काम सुरू झाले होते. चार वर्षे गाळ उपसण्याचे काम सुरू होते. मात्र आता नद्यांची स्थिती पाहिल्यास खरच गाळ उपसा झाला का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. वास्तविक राजापूर शहरवासीयांच्या डोक्यावर असलेली पुराची टांगती तलवार दूर व्हावी याकरीता अर्जुना नदीतील वरचीपेठ पूल ते बंदर धक्का, बंदर धक्का ते कादवली नदीपात्रातील आंबेवाडी तांत्रिक विद्यालय व बंदर धक्का ते पुढे जैतापूर खाडी दरम्यान वाहणार्या दोन्ही नद्यांचे प्रवाह मुख अशा पद्धतीने तीन विभागांत गाळाचा उपसा करण्याचे निश्चित करण्यात आले. याकरीता तात्कालीन आ. गणपत कदम यांनी पाठपुरावा केल्याने उद्योगमंत्री नारायण राणे यांनी निधी उपलब्ध करून दिला. अर्जुना व कोदवली नदीपात्रातील एकूण सुमारे 1 लाख 98 हजार 778 घनमीटर गाळ उपसण्यासाठी शासनाने सुमारे 35 लाख रूपये निधी उपलब्ध करून दिला होता .
सन 2009 साली गाळ उपसण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. पहिल्या वर्षी अत्यल्प म्हणजे सुमारे 7 हजार 720 घनमीटर एवढाच गाळ उपसण्यात आला. त्यानंतर सन 2010 मध्ये अर्जुना व कोदवली नदीपात्रातील सुमारे 65 हजार घनमीटर गाळ उपसण्यात आला. तर मे 2011 अखेरपर्यंत अर्जुना व कोदवली नदीपात्रातील सुमारे 98 हजार घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला. याकरीता सुमारे 27 लाख रूपये खर्च करण्यात आला व 8 लाख रूपये निधी शिल्लक राहिला होता व 1 लाख घनमीटर गाळाचा उपसा करणे शिल्लक राहिले होते. त्यानंतर आजपर्यंत गाळउपशाचे काम पुन्हा सुरू झालेले नाही.