मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी पुलावर पाच वाहनांची एकमेकांना धडक; एकजण गंभीर, दीडतासानंतर वाहतूक सुरळीत
लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी पुलावर पाच वाहनांची एकमेकांना धडक होऊन विचित्र अपघात झाला. बुधवारी दु. १२. १५ वाजण्याच्या दरम्यान झालेल्या या अपघातात दीडतास वाहतुकीचा खोळंबा झाला. सुदैवाने पुलावरून वाहने खाली कोसळली नाहीत. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे नुकसान झाले.
मुंबई ते गोवा या दिशेने जाणारा MH 48, AY
9314 ही महिंद्रा पिकअप आंजणारी पुलाजवळ रस्त्याच्या बाजूला उभी होती. मागून येणाऱ्या MH 45, BU 563 या मालवाहू ट्रेलरने महिंद्रा पिकअपला मागून धडक देत पुढे जाऊन उलटला. यावेळी ट्रेलरच्या मागून वेगात येणार्या MH04, KU6709 या आयशर टेम्पोने पुन्हा महिंद्रा पिकअपला मागून धडक दिली. पीकअपला दोन वाहनांनी धडक दिली असतानाच गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या MH 02 BS 7605 या फोर्ट कारला गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका १६ चाकी मालवाहू ट्रकने धडक दिली. या वाहनांच्या चालकांना अंदाज न आल्याने एकाच ठिकाणी हा विचित्र अपघात घडला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वाहने बाजूला काढण्यासाठी क्रेनच्या मदतीने प्रयत्न केले. यामध्ये सुमारे तास ते दीड तास वाहतुकीचा खोळंबा झाला. ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.