
ऐन गरमीत गोवळकोट, खेंड परिसरातील वीज पुरवठा खंडित; संतप्त ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयात ठिय्या
चिपळूण : शहरातील गोवळकोट व खेंड परिसरातील वीज पुरवठा
मंगळवारी रात्री खंडित झाला. उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरू न झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मध्यरात्री थेट महावितरण कार्यालयात ठिय्या मांडला. अखेर बुधवारी सकाळी या भागातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला. मात्र, येथील नागरिकांनी महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. गोवळकोट रोड येथील श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या कमानीलगत व गोवळकोट मदरसा येथील विद्युत रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने या भागातील वीजपुरवठा मंगळवारी रात्री 11 वाजल्यापासून खंडित झाला होता. या वेळ काही नागरिकांनी महावितरणकडे दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महाविरणमधील काही अधिकारी व कर्मचार्यांना वैयक्तीक मोबाईलवर फोन करूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या काही नागरिकांनी महावितरण कार्यालयात जाऊन विचारणा केली.